राजगड तोरणा – एक अविस्मरणीय अनुभव

राजगड- तोरणा खूप दिवस Un-Necessary च्या to do list मध्ये होता…पण मुहूर्त मिळत नव्हता…२५-२६-२७ जानेवारी २०१३ ला लागोपाठ सुट्ट्या असल्याने हीच ती मंगल घटिका अस म्हणून ट्रेक प्लान झाला…पण…. काही अपरिहार्य कारणांमुळे आम्हाला हा ट्रेक prepone करावा लागला….आता राजगड तोरण्याचा मुहूर्त होता ११-१२-१३ जानेवारी..ज्येष्ठ इतिहासकार अप्पा परब यांच्या बरोबर राजगड-तोरणा करायचा मानस होता पण आमची संख्या घटत घटत गेल्याने हे जमल नाही….१६ जणांच्या confirmation नंतर १० तारखेपर्यंत संख्या ११ झाली……

१० जानेवारीला शिर्डी फ़ास्ट / मुंबई- पुणे पैसेंजर रात्री ११:३५ ला ठाण्याहून पकडून ११ जानेवारीला सकाळी ४ पर्यंत पुणे स्टेशन – स्वारगेटहून नसरापूर किंवा थेट गुंजवणे (राजगडाच base village). सकाळी ८:३० ला ट्रेक सुरु करून ११:०० पर्यंत पद्मावती माची… राजगडावर वस्ती. १२ जानेवारीला अळू दरवाजाने राजगड उतरून ५-६ तासाच  ट्रेकिंग करून तोरणा, रात्री तोरण्यावर मंदिरात किंवा टेंट मध्ये वस्ती. १३ जानेवारीला तोरणा पाहून सकाळी ११:०० ला तोरणा उतरायला सुरुवात करायची ३:३० पर्यंत वेल्हे गावात आणि मग मुंबईकडे…… असा आमचा प्लान होता.
मोहिमेचे शिलेदार :- सुमिता मेनन ( नवीन सेनापती), सलिल मेनन (नवीन खजिनदार), किशोर राणे ( सर नौबत), मनोज पाटील, अमित सावंत , अरुण शितोळे उर्फ बड्या, मनोज अप्पू, संदीप जोशी, हितेश व्यवहारे, अभिजित आणि दस्तूर खुद्द कांचन म्हणजे मी ….
मी सुरुवातीलाच आभार मानून घेते Thank you kishor, thank u so much….
आमचं गुरुवार दिनांक १० जानेवारी च्या शिर्डी फ़ास्ट / मुंबई- पुणे पैसेंजरच रात्री ११:३५ च आरक्षण होतं . लोणावळा – भीमाशंकर ट्रेक साठी मी हिच गाड़ी दादरहून पकडली होती (तिकिट ठाण्याहुन असताना सुद्धा ) भीड़ चेपली होती अणि उशीर झाला होता म्हणून मी या वेळेस देखिल दादरहूनच गाड़ी पकडायची ठरवलं . सिद्धेश्वर एक्सप्रेस , शिर्डी फ़ास्ट पैसेंजर आणि कोकण कन्या लागोपाठ सुटत असल्याने अणि मध्य रेल्वेला प्रवाशांना टांगतं ठेवायची सवय असल्याने गाड़ी कोणत्या platform वर येणार हे चौकशी खिडकीला सुद्धा माहित नव्हतं, ५१०३३ गाड़ी आलटून पालटून ४ आणि ५ नं च्या platform वर लावत असल्याने मी वर ब्रिज वरच उभी राहिले आणि गाड़ी ४ नं platform ला लागेपर्यंत ५१०२७ दाखवणारया इंडिकेटरने शब्द फिरवला… नाही नाही आकडे फिरवले आता तो ५१०३३ म्हणत होता .बुद्धि पेक्षा पायांनी तत्परता दाखवल्यानं मी पटकन पायरया उतरून पुलाजवळ च्या जनरल डब्यात चढले आणि लक्षात आलं कि मी स्लीपर डब्यापासून बरयाच पुढच्या डब्यात बसले होते. ठाण्यात गाडी थांबली कि धावत आपल्या डब्यात जायचं म्हणून ठाणे आल्यावर un-necessary चे बाकीचे लोक कुठे उभे आहेत आणि किती मागे जावं लागेल याचा अंदाज बांधत असतानाच मागून एका काकांनी “hope you are not running from your house” असा प्रश्न टाकला . अहो काका अस फक्त सिनेमातच होतं हे म्हणायला हि माझ्याकडे वेळ नव्हता, घाबरून मानेनेच नाही अस उत्तर देऊन मागे धावायला सुरुवात केली, किशोरला फलाटावर पाहून सुटकेचा निश्वास टाकला आणि आता अगदी बरोबर डब्यात चढले. सीट शोधे पर्यंत कल्याण आलं, मनोज पाटील आणि हितेश गाडीत चढले . सकाळी ४.०० पर्यंत पुण्यात पोहोचणार असल्याने शक्य तेवढी झोप घेणार होतो .ब्यागा व्यवस्थित लावून झोपायची तयारी करणार इतक्यात ५-६ मुलं त्यांच्या सीट शोधत शेजारच्या compartment मध्ये आली आणि मग त्यांनी सकाळी २ वाजेपर्यंत ऑफिस , क्रिकेट , राजकारण ( दिल्ली ते अगदी गल्ली) यावर यथासांग चर्चा केली या सगळ्यात मिळेल तेवढी झोप काढून सकाळी सुमारे ४ च्या दरम्यान आम्ही पुणे स्टेशनला उतरलो . स्वारगेट हून अभिजित join होणार होता .आधीच एस. टी. च्या आंदोलनामुळे खूप गाड्या रद्द झाल्या होत्या अजून गोंधळ नको म्हणून किशोरने त्याला पुणे स्टेशनलाच बोलावून घेतलं . आम्ही तो पर्यंत सकाळी…सकाळी हां ४:३० च्या सुमारास चहा , पोहे आणि बुर्जी चा नाश्ता केला. पुणे स्टेशन बस स्टॉप ला आलो आणि ६:३० ची भोर गाडी पकडायची ठरलं इतक्यात आंघोळ आणि दाढी करून चकचकीत अभिजित आला. बस स्टॉप वरची शिवनेरी आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या मनोज अप्पूला नवीन खजिनदार सलिल ने पुढच्या वेळेस charter flight बोलावू अस सांगून लाल डबा दाखवला आणि आम्ही गाडीत बसलो. एस. टी. महामंडळ महाराष्ट्राच्या काना कोपरयात पोहोचत असल्याने आणि कमी खर्चिक असल्याने ट्रेकर्स साठी एकदम बेस्ट. या मनोज अप्पूला खरचं हिंदी /मराठी कळत नाही का ?? ” खिडकी लावून घ्या ना भाऊ” या सहप्रवाशाच्या विनंतीला मनोज अप्पू ने “what did he say?” अशी प्रतिक्रिया दिली त्यावर सलीलचं ” अबे खिडकी लगा साले” हे मात्र त्याला लगेच कळलं. सलिल मला वाटत पुण्यात जन्माला यायचा होता शेवटच्या क्षणी देवाने त्याला केरळात पाठवलं. सकाळी ७:३० च्या आस पास आम्ही नसरापूर फाट्यावर उतरलो. अमित, हितेश आणि शितोळेन्नी जीप वाल्याबरोबर negotiate केलं आणि आम्ही गुंजवणे गावाला लागलो. किशोर सारखी अंगकाठी असलेली माणसं कुठही adjust होतात…. अभिलाष असता तर त्याला कुठे adjust केल असत यावर पण मत प्रदर्शन झाल.
वातावरणात किंचित गारठा होता एवढी शांत सकाळ फक्त ग्रामीण भागातच अनुभवू शकतो आपण. सकाळच प्रसन्न वातावरण अनुभवत आणि खूप सारे खंड्या, कोतवाल, दयाळ आणि काऊ चिऊ पाहत पाऊण-एक तासात आम्ही गुंजवणे गावात आलो. राजगड चढण्यासाठी तीन ठोस वाटा आहेत एक गुंजवणे गावातून चोर दरवाजा मार्गे , एक पाली दरवाजा मार्गे आणि एक अळू दरवजा मार्गे . आम्ही चोर दरवाजा मार्गे पद्मावती माची चढणार होतो. गावात एका छोट्या हॉटेल मध्ये चहा पिऊयात असा एक प्रस्ताव आला , किशोर नाखुशीनेच हो म्हणाला. किशोरला केव्हा एकदा गडावर पोहोचतो अस झाल असावं आणि आता तर काय हातात जुन्या १२x ऐवजी नवा कोरा ४२x होता. एका दुसरया हॉटेल मधे लावलेले बरेचसे फोटो आणि बाहेरच्या अंगाला असलेली आपण दिवाळीत करतो तशी पण बऱ्या पैकी मोठी आणि सिमेंटची राजगडाची अप्रतिम प्रतीकृती ( नेढं सुद्धा बनवलं होत) पाहून आम्ही मार्गस्थ झालो. एकांतासाठी इतक्या दूर आलेल्या एका जोडप्या बरोबर आम्ही ११ जणानी त्यांना company देत गड चढायला सुरुवात केली. बरयाचदा ट्रेक ची सुरुवात सपाटीने होते पण राजगडचं तो त्याची सुरुवातच चढणीने झाली आणि काही ठिकाणी ती खूपच खडी होती . अजूनही मला प्रत्येक ट्रेकला “अग घरी निवांत आराम करायचा सोडून इकडे का आली आहेस तंगड्या तोडायला?” अस प्रश्न पडतो. मनोज पाटील, किशोर, अमित असे बिनीचे शिलेदार सोडले तर आम्ही बाकीच्या सर्व मावळ्यांनी कमी जास्त प्रमाणात धापा टाकतच ११:०० च्या दरम्यान चोर दरवाजा गाठला. हा चोर दरवाजा स्वत:च नाव सार्थ करतो, दरवाजा आहेच असा कि कुणाला कळणार नाही. चोर दरवाजाने आत शिरल्यावर समोरच दिसतो तो पद्मावती तलाव, तलाव बरया पैकी सुस्थितीत आहे, एका बाजूने तलावात उतरण्यासाठी दगडी कमान बांधलेली आहे. तलाव सोडून वर गेल्यावर काळ्या दगडातलं दोन खोल्यांचं प्रशस्त पर्यटक निवास आहे. तिथून पद्मावती देवी मंदिराकडे जाताना महाराजांच्या पहिल्या राणी सईबाई साहेबांची समाधी आहे. पद्मावती देवीचं मंदिर छान प्रशस्त अगदी १५-२० माणसं झोपू शकतील एवढं आहे ( छ्या बाबा ट्रेकिंग सुरु केल्यापासून न मी जागा किती माणसं झोपू शकतील अशा दृष्टीकोनातून पाहायला लागलेय). रमण च्या technical डोळ्यांनी तेवढ्यात मंदिराच्या तुळया तिरक्या झाल्यात हे टिपल. मंदिराच्या समोर उजव्या हाताला पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे यात बारमाही पाणी असत म्हणे…. आम्ही आमच्या ब्यागा पर्यटक निवासात ठेऊनच माचीवर थोडं फिरलो. किशोर तटावर उभा राहून आम्हांला समोरचा तोरणा , सिंहगड , रायगड , पाली दरवाजा दाखवत होता तिथेच आम्हाला पहिल्यांदा Andrew दिसला. हा US चा Hongkong स्थित Andrew पुण्यात राहून महाराष्ट्रातले गडकोट एकटाच धुंडाळत होता. आमच्या Indian मनोज अप्पूला इथली भाषा कळत नाही या Andrew ला कशी कळत असेल? मला न केव्हा केव्हा काहीही प्रश्न पडतात …
आम्ही गडावर आल्याची नोंद तिथल्या पुरातत्व विभागाच्या दफ्तरात केली …( राजगडावर पण ऑफिस ).  दुपारी १:०० वाजता आम्हाला आमच्या पोटाची जाणीव झाली आणि आम्ही जेवायला बसलो. सुमीच्या leadership मुळे घाबरून का होईना सगळ्यांनी खूपच जेवण आणलं होतं आणि ‘अहो आश्चर्यम’ कध्धी कध्धी डबा न आणणाऱ्या मनोज अप्पू ने फिश करी आणि बरोटा आणले होते. दुर्दैवाने फिश करी आंबली पण आम्हाला गुंजवणे गावापासून इथपर्यंत साथ देणाऱ्या कुत्र्याची मात्र ऐश झाली.बरोबर २:०० वाजता सुमी ने पेंगुळलेल्या मावळ्यांना हाक दिली आणि आम्ही पद्मावती माची आणि सुवेळा माची पाहायला निघालो. पुरातत्व खात्याने एवढे करोडो रुपये खर्च करूनही गडावर नुसतेच अवशेष दिसतात. राजवाडयाचे अवशेष, अंबारखाना, सदर आणि सदरेखाली ५-६ माणूस बसू शकेल अशी छोटी खोली (गुप्त मसलतींसाठी असावी का?) पाहिली. या सगळ्यात दारू कोठार हि एकच वास्तु शाबूत आहे आणि म्हणूनच कडी कुलपात असावी. एक सांगायचचं राहील गड चढल्यापासून शितोळे, मनोज पाटील आणि अमित राजगडाबद्दल, राजांबद्दलच बोलत होते. शिवराय, स्वराज्य, गड, कोट, गनिमीकावा या सगळ्या बद्दल बोलताना त्यांचे डोळे आणि आमचे कान मोठे होत होते.
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।
 शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।
आग्र्याहून सुटकेनंतर महाराज आणि जिजाऊ साहेबांची भेट , सईबाई साहेबांचा मृत्यू आणि राजा राम महाराजांचा जन्म या आणि अशा अनेक महत्वाच्या घटना पाहिलेला आणि २६ वर्ष मराठेशाहीची राजधानी होऊन राहिलेल्या राजगडावरचे अवशेष पाहून हे सर्व ३५० वर्षांपूर्वी कसं दिसत असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो… time machine चा शोध अजून का लागला नाहीये??? कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोरयात १२ कोस पसरलेला राजगड पूर्वी मुरुंब देवाचा डोंगर म्हणून माहित होता. १६४६-४७ च्या दरम्यान महाराजांनी मुरुंब देवाचा डोंगर जिंकून घेतला व त्यास “राजगड” नाव दिले. गडाला तीन सोंडा आहेत त्यावर राजांनी माच्या बांधल्या व त्यास पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची अशी नावे दिली.
पद्मावती माचीवर ढालकाठी जवळ तिठा लागतो त्यातली एक वाट सुवेळा माचीकडे , एक बालेकिल्ल्याकडे आणि एक संजीवनी माचीकडे जाते . आम्ही सुवेळा माचीकडे जाताना वाटेच्या खालच्या बाजूला गुंजवणे दरवाजा दिसला. गडावर यायची हि अजून एक वाट. तसेच मधेच एक छोटी टेकडी लागली त्याला डूबा म्हणतात, या डूब्याच्या डाव्या बाजूने आम्ही माचीकडे वळलो आणि समोर दिसला झुंजार बुरुज. या ठिकाणी छायाचित्रकार मंडळी पुढे सरसावली आणि खूप सारे फोटो काढून आम्ही निघालो… बुरुजाच्या थोडस पुढे नेढं होत याला ‘वाघाचा डोळा’ पण म्हणतात. एक एक करत आम्ही सर्व जण नेढयात जाऊन बसलो पण सगळ्यात शेवटी आलेला अमित काय बोलत आला कोण जाणे? त्याचा आवाज ऐकून मधमाशा उठल्या आणि त्यांना उठलेल पाहून आम्ही पण काढता पाय घेतला. माचीच्या टोकावर जाताना लक्षात आल कि माचीला दुहेरी तटबंदी आहे यालाच चिलखती तटबंदी अस म्हणत असावेत. काय idea आहे राव… शत्रूने शंभर प्रयत्न करून बाहेरची तटबंदी पाडली तर स्वागताला तीतकीच अभेद्य दुसरी तटबंदी आहेच शत्रू हे पाहूनच गारद होत असेल….. चिलखती तटबंदी आणि चिलखती बुरुज… राजांनी मोठ्या प्रेमानी गड आकारला होता
पुणं झालं जुनं , गाऊ भोर त्या भरन्याला
सोनीयाची ग पायरी राजगड तोरण्याला !
माचीच्या या टोकावर पुन्हा फोटोग्राफी झाली… फोटोग्राफर्स कॅमेरात आणि आम्ही आमच्या डोळ्यात सुवेळा माची आणि राजगड साठवत होतो. सुवेळा माचीवरून खाली डूब्याच्या बरोबर उजव्या अंगाला दिसतो तो काळकाईचा बुरुज आम्ही तिकडे न जाता मोर्चा बालेकिल्ल्याकडे वळवला. सूर्यास्त बाले किल्ल्या वरून पहायचा होता आम्हाला…. राजगड जिथे संपतो अस वाटत तिथे तो सुरु होतो असं झालं माझं बालेकिल्ल्याकडे पाहून. माझ्यासारखा शत्रू जर कदाचीत त्या तटबंद्या तोडून आत आला असता तर बालेकिल्ला पाहून परत घरी गेला असता. सरळसोट अरुंद वाटेचा बालेकिल्ला, चढतानाच जीव जाईल एखाद्याचा. आता रेलिंग असल्यामुळे जरा, जरा हं सोपी झालीय हि चढण. राजांचा राजगडावर एवढा जीव का जडला होता हे पाहण्यासाठी राजगडाचा बालेकिल्ला पहाच. “राजियांचा गड , गडांचा राजा” उगाच नाही म्हणत त्याला. आम्ही बाले किल्ल्याच्या दरवाजात आलो. दरवाजा अजूनही फार छान व मोठा आहे. दरवाजातून आत आल्या आल्या दिसते ते जननी मंदिर आम्ही आत न जाता वर जायला वळलो .वर जायला चांगल्या नजीकच्या काळात बांधलेल्या पायऱ्या लागल्या, वर गेल्याबरोबर समोर तळ दिसलं त्याच्या  आकारामुळे बहुदा त्याला चंद्रकोर तळ म्हणत असावेत. या वेळेस शितोळे नि सलिल वर सरशी करत तळ्याच्या शेजारी हिरव्या गवताचा बिछाना पटकावला. सलिल सोडून आम्ही सर्व पद्मावती माचीच्या बाजूला असलेल्या बुरुजाकडे गेलो. तिथून पद्मावती माचीचा फार सुंदर view दिसत होता, सिंहगड मात्र धुक्यामुळे दिसत नव्हता. बालेकिल्ल्यावरून राजगड अधिकच देखणा दिसतो. फोटोग्राफर्स ची हत्यार परत बाहेर आली. राजगडला प्रदक्षिणा घालुन आलेल्या Andrew ला किशोर ने अजून कोण कोणते किल्ले पाहायलाच हवे त्याची माहिती दिली. संजीवनी माची वरुन तोरण्याकडे जाणारा ridge पाहून उदया किती चालायचयं याचा थोडा बहुत अंदाज आला आम्हालाबाजारपेठ, सदर , राजवाडा पाहत आणि Un-Necessary Hikers च्या संस्थळा बद्दल चर्चा करत आम्ही सूर्यास्त पहिला व परत पद्मावती माचीच्या दिशेने उतरू लागलो थोडी थंडी जाणवायला लागल्यामुळे आम्ही शेकोटी साठी रस्त्याने थोड सरपण गोळा करत निघालो. अपेक्षेपेक्षा कमी पण आता बरया पैकी थंडी लागायला सुरुवात झाली होती. बहुदा शुक्रवार असल्याने असेल कदाचित राजगडावर फार मंडळी नव्हती, आम्ही ११ जण (पर्यटक निवासात) आणि अजून दुसरे दोघेजण (मंदिरात) एवढेच होतो वस्तीला. सलीलने सर्वांसाठी चहा केला …जियो सलिल ( चहाला अमृततुल्य का म्हणतात हे कळण्यासाठी तरी अशी तंगडतोड कराच एकदा). सुमीने ready to eat आणायला सुरुवात केल्यापासून kitchen committee च काम खूप सोप्प झालयं (muahh सुमी ..) …. पण जेवणा अगोदर रंगली ती गाण्यांची मैफल …शितोळे ,सलिल, सुमी, किशोर, मनोज पाटील, हितेश, रमण, संदीप सर्वांनी एक से बढकर एक जुनी गाणी म्हंटली…मी मात्र कोरस मध्ये होते..जेवणाचा पावभाजी, चपात्या आणि वर पापड असा फक्कड बेत जमलाजेवण संपवून थकल्या भागल्या धारकरयांनि पथारया पसरल्या (स्लीपिंग ब्याग हो) आणि क्षणात माझी ब्रह्मानंदी टाळी लागली.
दुसरा दिवस :(१२ जानेवारी )
सकाळी ६:०० ला अमितच्या मोबाईलचा गजर झाला ( या वेळेस अमितच आवडत “ऊठा राष्ट्रवीर हो” गाणं नव्हत)आणि सगळे उठले……उठले म्हणजे मी नुसतीच जागी झाले.रात्री कोण कोण घोरत होत यावर चर्चा करून आम्ही आमच्या स्लीपिंग ब्याग आवरल्या सकाळची सगळी काम आवरून (म्हणजे ब्रश वगैरे वगैर वगैरे) आणि ब्रेड बटर चा भरपेट नाष्टा करत आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. आज लांबचा पल्ला गाठायचा होता, संजीवनी माची अळू दरवाजाने उतरून आम्हाला तोरण्याकडे जायचं होतं , माचीकडे जाताना पाली दरवाजाचा छान view दिसतो. पाली दरवाजा राजगडा वर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. सुवेळा माची प्रमाणेच संजीवनी माचीलाही दुहेरी चिलखती तटबंदी आणि चिलखती बुरुज आहेत, तसच पाण्याची टाकं हि आहेत तीही त्यांचा तळ दिसावा इतकी स्वच्छ. मध्येच आम्हाला एक छोटा दरवाजा दिसला दरवाजात उतरायला छोट उतरतं भुयार होतं आणि दरवाजा तर अगदीच छोटा बसून बाहेर याव एवढाच होता. मी, सलिल, सुमी, अभीजीत आणि रमणनं थोडा वेळ तिथे काढला. परत वर येत असताना मनोज आणि अमित बुरुजावारचा भगवा हातात घेऊन करत असलेल्या शिवगर्जना ऐकू आल्या.
प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय…..
ब्यागा अळू दरवाजाजवळ ठेवत आम्ही माचीच्या टोकाशी आलो आता आम्हाला तिथून तोरण्याकडे जायचा ridge स्पष्ट समोर दिसत होता. शनिवार रविवारी खूप ट्रेकर्स येत असल्याने त्यांच्यासाठी दही, ताक, लिंबू सरबत घेऊन भवतालच्या गावातले लोक वर येताना दिसले. हे लोक पायात विमान टायरच्या चपला किंवा अगदी स्लीपर घालून सुद्धा काय भारी चढतात किल्ले.आम्हालाही दही विकणारा विलास भेटला आणि त्याने आम्हाला २५ रुपयांना एक ग्लास( पेल्याला ग्लास म्हणत होता तो) अस चक्क गंडवल आम्ही पण दही पिउन झाल्यावर negotiate करायला लागलो आमची हि घासाघीस पाहून त्याने आम्हाला त्याचं  रस्त्यात लागणारं घर दाखवून माझ नाव सांगून घरी ताक प्या अशी offer दिली. आम्ही माचीवरून अळू दरवाजात परत येताना दोन तटबंद्यांच्या मधून चालत निघालो .तटबंद्यां मधलं अंतर एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल एवढं आहे आणि काही काही ठिकाणी तर तटबंद्यां चांगल्या दोन- अडीच पुरुष उंच आहेत मला न खूप भारी आणि गूढ वाटत होत सगळ… १०:००-१०:३० ला आम्ही अळू दरवाजातून गडाच्या बाहेरच्या बाजूला आलो म्हणजे तोरण्याच्या विरुद्ध बाजूला आलो. बाहेरून दिसत होत्या त्या उंचच उंच सुबक, आखीव, रेखीव काळ्या तटबंद्यां. आणि वरचा अभेद्य बालेकिल्ला. माचीच्या बुरुजाला वळसा घालून आम्ही समोरचा तोरणा पाहिला आणि आगेकूच चालू ठेवली. गड चढताना कठीण कि उतरताना?? हा अजून एक अनुत्तरीत प्रश्न. चांगली मळलेली वाट होती. दुपारचं जेवण बुधला माची जवळ करायचं ठरलं. आता फक्त सरळ चालायचं म्हंटल्यावर आपोआप आमच्या तीन तुकड्या पडल्या रमन, मनोज अप्पू, अभिजित, हितेश ची पहिली तुकडी बरीच पुढे होती मागोमाग मी, सलिल, सुमी, शितोळे आणि संदीप आणि सगळ्यात मागच्या झेंड्याच्या तुकडीत किशोर,अमित, मनोज पाटील असे फोटोग्राफेर्स. अर्ध्या तासाच्या आत बाहेर आम्हाला एक डांबरी रस्ता लागला आत्ताचा हा डांबरी रस्ता म्हणजेच ती पाली खिंड राजे सुरत लुटायला याच पाली खिंडी मार्गे गेले होते म्हणे… पुढे जराशा अंतरावर विलासाच घर लागल त्या हुशार विलासन सगळ दही विकायला नेल होत घरी फक्त २-३ पेले ताक शिल्लक होत. रस्ता पाहून हितेशच्या काय मनात आल कुणास ठाऊक त्याने तिथूनच मागे जायचं ठरवलं..२ वर्षांनी ट्रेक ला आलेला हितेश खूपच दमला होता. अमितने किशोरला  “कसे रे तुमचे जुने ट्रेकर्स” असा टोमणा मारला आणि किशोर “बर्रर्र ” म्हणून गूढ हसला. तितक्यात गौरांगचा फोन आला आणि मुकुंदचे अमित आणि शितोळे थोडे tension मध्ये आले. अमितने जळगावला मित्राच्या लग्नाला जाण्याच कारण सांगितलं होत ऑफिस मध्ये तर शितोळे च्या घरी emergency होती. काल आमच्या बरोबर राजगडावर वस्तीला असलेले ते काका आणि त्यांचा सहकारी पुन्हा भेटले काका सत्तरीत असावेत बहुदा पण उत्साह मात्र एखाद्या तरण्याला लाजवील असा होता. मध्ये आम्ही एकदा रस्ता चुकलो आणि एका वाडी त आलो तिथे एका घरात पाणी आणि ताक प्यायलो ( यावेळेस ग्लास म्हणजे ग्लासच होता) त्या काकांनी आम्हाला रस्ता दाखवला. उन खूप असल तरी असह्य उकाडा नव्हता. हवेत अजूनही गारवा होता. त्यामुळे चालताना त्रास होत नव्हता. पण रस्त्यात छोटा ब्रेक घेण्यासाठी झाडी नव्हती. बरयाच वेळाने रस्यात थोडी झाडी पाहून थांबलो आणि संत्री खाल्ली. या वेळेस मात्र मला त्रास झाला, खूप कफ होता त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता पण या ब्रेक नंतर बर वाटल. शेवटच्या प्याच ला मात्र हवालदिल झाले, बुधला माचीच्या बुरुजाच्या पायथ्याशी बसून दुपारी ४:०० ला जेवण उरकल. थोडा वेळ थांबून पुढे निघालो ……….कुण्या पुण्यात्म्याने तिथे लोखंडी शिडी लावली आहे. आम्ही शिडी चढून वर जात असताना एक ग्रुप शिडी उतरण्यासाठी थांबला होता. अमित जसा शिडी चढून वर गेला तस त्यातल्या एकाने ” या राजे या” म्हणत अमितला अलिंगन दिले अमितच्या department मधला एक जण अमितला भेटला होता आणि जळगावला गेलेला अमित तोरण्यावर अव्वाक का काय म्हणतात तो झाला होता. त्यात वरून पाहत असताना दुर्दैवाने चुकून एक छोटा दगड त्या ग्रुप मधल्या एका छोट्या मुलीच्या डोक्यात पडला आणि अमितच्या “watch out ” वर तो खूप उखडला. पुढचा ट्रेक अमित ने tension मध्ये पूर्ण केला असावा. एका उंच दगडावर आम्हाला ते सत्तरीतले काका आणि त्यांचा सहकारी घोड्यावर बसतात तसे बसलेले दिसले आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर कळल कि त्या दगडाच्या बाजूचा वळसा त्यांनी मिस केला आणि त्या दगडा वरुनच पुढे वाट आहे अस समजून चढले आता चढले खर पण उतरता येईना मग आमच्यातल्या काहीजणांनी त्यांच्या ब्यागा खाली उतरवून घेतल्या तेव्हा कुठे ते खाली उतरून पुढे निघाले. कोकण दरवाजातून पुढे होत आम्ही मेंगाई देवी मंदिराकडे निघालो.
तोरणा – स्वराज्यातला पहिला किल्ला …राजांनी स्वराज्याच तोरण हा किल्ला घेऊनच बांधल…कानद खोरयातला तोरणा पुणे प्रांतातला सगळ्यात उंच किल्ला आहेगडाला झुंजार माची आणि बुधला माची अशा दोन माच्या आहेत…..एक कोस लांब आणि पाव कोस रुंद असा गडाचा पसारा…. १६ वर्षाच्या राजांनी तोरणा जिंकून दुरुस्तीला सुरुवात केली आणि भवानी पावली किल्ल्याच्या तटात राजांना खजिना सापडला.. हा खजिना राजांनी तोरण्याच्या दुरुस्तीकरिता आणि राजगडच्या उभारणीकरिता वापरला. गडाच्या बालेकिल्ल्यावर मेंगाई देवीच मंदिर आहे. बुधला माची, कोकण दरवाजा, मेंगाई देवी मंदिर, झुंजार माची, तोरणजाई मंदिर आणि काही वास्तूंचे अवशेष गडावर आहेत.
मेंगाई देवीच मंदिर आमचा आज रात्रीचा पत्ता होता म्हणून आम्ही थेट मंदिराकडेच गेलो किशोर अगोदरच पोहोचला होता आणि हे काय??? एक एक करत श्रीकांत, मकरंद आणि स्टीवन देवाळामागून आमच्या पुढे आले हे तिघेजण तोरण्यावर येणार हे किशोर सोडून आमच्यातल्या कुणालाच माहित नव्हत त्यामुळे आम्ही सगळेच जसे जसे त्यांना पाहत होतो  तसे तसे आश्चर्य चकित होत होतो या घडीला आम्हाला किशोरच्या त्या गूढ हास्याच रहस्य उलगडल. मंदिरासमोर थोड पुढे खाली पिण्याच्या पाण्याच टाक होत त्याला पाहून आम्हाला आम्ही सकाळ पासून तोंड देखील धुतलं नसल्याच लक्षात आल, सर्दी मुळे मी सारखीच नाक पुसत होतेगार पाणी तोंडाला लागल आणि नाक सोलून निघाल्याची जाणीव झाली, पण आता कस अगदी फ्रेश वाटत होत…राजगड च्या मानाने तोरण्या वर चांगलीच थंडी होती. मला थंडी बिलकुल सहन होत नाही पण म्हणतात न हौसेला मोल नसत त्यात आमची हौस हि अशी… दोन दोन jacket घेऊन जाइन पण जाईनच ट्रेकला हा हट्ट… मकरंद, स्टीवन आणि श्रीकांतने वेल्हे गावातून “बटाट्याची रस्सा भाजी” आणली होती, अमित आणि स्टीवनने देवळाच्या बाहेर चूल करून भाजी गरम करायची तयारी केली, आणि आत सलिल चहा आणि सूप च्या तयारीला लागला. चहा आणि सूपची वाढी झाल्यावर सुमी, सलिल आणि मी आत देवळातच गप्पा मारत बसलो , मनोज अप्पू torch च्या प्रकाशात पुस्तक वाचत बसला होता (हा एक आपल्याच तंद्रीत असतो.) बाकीचे सर्व बाहेर गप्पा ठोकत होते. स्टीवन आणि अमित ने भाजी गरम झाल्यावर चुलीवरच भात लावला. सुमी ने ready to eat डाळ गरम केली, पापड भाजले. सुमी 

kitchen committee ची हेड अणि मी हेल्पर या पदावर कार्यरत होतो. ” बटाट्याची भाजी”, भाकरी, वरण-भात आणि पापड बेष्टच बेत झाला. एक ६ जणांचा ग्रुप तोवर किल्ल्यावर आला होता. मेंगाई देवी मंदिर चांगल प्रशस्त असल्याने आणि आम्ही ३ tent पण carry केलेले असल्याने झोपायच्या जागेची अडचण नव्हती. शितोळे, रमन, मकरंद, अमित, किशोर, मनोज पाटील, अभिजीत बाहेर tent मध्ये झोपले तर मी, सुमी, सलिल, स्टीवन, संदीप, मनोज अप्पू, आणि श्रीकांत आत मंदिरात झोपलो. आज खूपच दमल्याने आम्ही सर्व जण लगेच स्लीपिंग ब्याग मधे शिरलो आणि झोप लागली सुद्धा …पण थोड्याच वेळात कानाच्या अगदी जवळ काहीतरी आवाज झाला आणि मी जागी झाले. मेणबत्तीच्या प्रकाशात मला माझ्या अगदी डोक्याजवळून धावताना उंदीर दिसला आता मात्र माझी झोप उडाली. मी परत परत सुमीची torch घेऊन तो आमच्या ब्यागा तर कुरतडत नाहीये ना हे तपासात राहिले, झोप अनावर होत होती म्हणून मी जागा बदलली पण तरी देखील रात्रभर दचकून दचकून जागी होत होते.

तिसरा दिवस :
सकाळी सुर्योदय पहायचा म्हणून लवकर उठलो पण थंडीमुळे स्लीपिंग ब्याग मधुन बाहेर यावसं काही वाटत नव्हतं . कसंतरी  उठून बाहेर आलो सूर्योदय अजून व्हायचा होता आम्ही समोरच्या राजगडाकडे पाहत उभे होतो.. क्षितीजावर लाल, पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या कित्येक छटांमध्ये राजगड मोठा राजस दिसत होता. आम्हांला झुंजार माची पाहून तोरणा उतारायचा होता म्हणून पटापट ब्रश वगैरे करून चहा घेऊन आणि काही सटर फटर खावून आम्ही तयार झालो आणि मेंगाई मंदिराच्या डाव्या हाताला असलेल्या बुरुजाकडे वळलो… झुंजार माची अगदी सापासारखी दिसत होती इथून वळणा वळणाची आणि त्रिकोणी डोक्याची…. माचीकडे जायला एक लोखंडी शिडी आहे ब्यागा वर ठेऊन जायचा निर्णय आम्ही माकडांना पाहून बदलला आणि ब्यागा घेऊनच उतरायला सुरुवात केली माचीकडे जायचा रस्ता त्यामानाने खूपच बिकट होता. पण मनोज पाटील, अभिजित आणि अमितच्या मदतीने सगळ्यांनी हा रस्ता पार केला. मधेच किशोर ओरडला मला “कांचन सोपा प्याच कठीण करू नकोस “किशोर…. आता ५ फूट २ इंच माणसाने पाय तरी किती लांब लांब टाकायचे ?? माचीवर जाताना एक छोट दार आहे तिथून खाली उतरायला खुप अरुंद आणि बिकट वाट आहे. छ्ये वाट कसली मला पहिल्यांदा कडेलोटाची जागा वाटली ती. माचीच्या टोकाला बुरुजाला बाहेरच्या बाजूला जायला मस्त वाकून जाऊ शकू असा दरवाजा आहे. आम्ही तिथे गेलो आणि आणि आमचे मॉडेल पटापट pose द्यायला लागले ठीगभर फोटो काढून आणि  माचीचं पोटभर दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. तटबंदीवर चालत चालत आम्ही कोठी दरवाजा जवळ आलो….आणि हे काय वर चक्क हॉटेल आहे ….२-२ ग्लास लिंबू सरबत पिउन आम्ही तोरणा उतारायला सुरुवात केली. बिनीच्या दरवाजा पासून रेलिंग लावलेले असले तरी काही काही प्याच अवघडच आहेत. आज गडावर बरीच गर्दी होणार अस दिसत होत…. कितीतरी हवशे नवशे गवशे तोरणा चढताना दिसत होते. काही काही जोडप्यां पैकी मुलींचे चेहरे पाहून हे ब्रेक-अप करूनच घरी जाणार अस दिसत होतं ….एक जण तर दुपारी १२ च्या सुमारास ७-८ महिन्यांच्या बाळाला आणि बायकोला घेऊन चढताना दिसला…किशोरने त्याला परत मागे फिरायचा सल्ला दिला तरी बच्चा ऐकतोय कुठे… त्याची बायको हुशार निघाली तिने त्याला मागे फिरवलं. रस्त्यात किशोरने मला बरेच interesting आणि बोधपर किस्से ऐकवलेकाल स्टीवन, श्रीकांत आणि मकरंद ने पण खूप मेहनत केली होती हे दिसलं… आता आम्ही वेल्हे गावात आलो पण या तिघांनी गाडी अगदी गावाच्या दुसरया टोकाला पार्क केली होती…. तोरणा उतरण्यापेक्षा हे अंतर आता जास्त वाटत होतं…आम्ही चिकन आणि मटण थाळी मागवली.. जेवण येईपर्यंत आम्ही चांगली ३ ताट भरून tomato slice खाल्ले. हॉटेल मधले काका अगदी आतिथ्यशील होते आग्रह करून करून वाढत होते …जेवण तर उत्कृष्टचं होतं पण इंद्रायनीचा भात अप्रतिम… चिकट पण ultimate होता…आता सगळ्यांनाच परतीचे वेध लागले होते….शितोळे ना रविवारी night shift ला जायचं होत म्हणून मग स्टीवन च्या गाडीत मकरंद आणि श्रीकांत बरोबर ते पण जाणार होते, किशोर ने माझं पण त्याच गाडीच तिकीट काढलं..तो पर्यंत दुसरी जीप पण आली … आम्ही स्टीवन च्या गाडीतून थेट मुंबईतच जाणार होतो पण बाकीचे लोक नसरापूर पर्यंत आणि तिथून पुढे स्वारगेटला गेले…आणि स्वारगेट हून त्यांना थेट गाडी मिळाली….मी आता उद्या परत ऑफिसला जायचं  या विचारात होते….पण मला खात्री आहे किशोर च्या डोक्यात मात्र पुढच्या हरीशचंद्र गड ट्रेक किंवा माळशेज रय़ाप्लिंगचं  किंवा मग अजून काही off beat ट्रेकचं प्लानिंग चालू असणार…
 
आता पुढच्या ट्रेक साठी आईची permission मिळवण्यासाठी काय शक्कल लढवायची बरं ???????
 

Kishor’s photo gallery

Manoj’s photo gallery

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>