हरिश्चंद्रगड – surprise package

फार पूर्वी केव्हातरी लोकप्रभा मधल्या नळीच्या वाटेचा फोटो पाहून हरिश्चंद्रगडाच्या प्रेमात पडले होते, पण माझा आणि  या  वाटेचा योग काही जुळत  नव्हता. इतकी वर्ष नुसतीच ट्रेकिंगच्या  देहूआळंदीच्या वारया  करत होते पण या ट्रेकर्स च्या पंढरीच दर्शन व्हायला २०१२ ची दिवाळी उजाडावी लागली, पण तेहि अगदी मिळमिळीत पाचनईच्या वाटेने. मला या देवळातल्या विठोबापेक्षा वारीच्या वाटेचं (नळीच्या वाटेचं) अप्रूप जास्त होतं. Unnecessary Hikers नुकतेच फेब्रुवारी मध्ये तोलार खिंडीने  हरिश्चंद्रगड चढले होते आणि नळीच्या वाटेने उतरले होतेतेव्हाहि काही वैयक्तिक कारणांमुळे जाणं शक्य झालं नव्हतं. “श्रीकांतचा ONGC चा ग्रुप नळीच्या वाटेने हरिश्चंद्र चढणार आहेत आणि साधले घाटाने उतरणार आहेत मी जातोय, तुम्ही कुणी इंटरेस्टेड असाल तर येऊ शकता” असा किशोरचा मेल पाहिला आणि मनात नक्की केलं कि हि वारी चुकवायची नाही. 

 

Unnecessary Hikers ने १० तासात हरिश्चंद्र गड नळीच्या वाटेने उतरला होतामनोज २१  का २२ तासात पूर्वी पावसाळ्यात नळीच्या वाटेने चढला होताआंतरजालावर (internet वर) किमान कालावधी ९ तास तरी लागतातच असं वाचलं त्यात किशोरच्या मेल ला लोकांचे रिप्लाय पण +ve येईनात. बापू ने तर एप्रिल च्या उन्हात मी काही येत नाही आणि कृपा करून तुम्ही पण कुणी जाऊ नका अशी विनंती केली. भरीस भर म्हणून जेव्हा सोमवारी आईला मी जाऊ का म्हणून विचारलं तर आईच्या “अगं मरशील उष्माघाताने” या वाक्याने मला परत विचार करायला भाग पाडलंपण मनात म्हंटल “कांचन अभी नही तो कभी नही”.१९ ला श्रीराम नवमी निमित्त सुट्टी होती म्हणून मला मानसिक तयारीला बराच वेळ मिळाला. कमीत कमी सामान घ्यायचं ठरवलं कारण २-३ लिटर पाणीएकवेळचा डबाथोडंसं इतर खायलास्लिपिंग ब्याग आणि स्वत: पुरती का होईना पण संत्री सोबत घेऊन ती नळीची वाट काय माहित किती तास चढायची होती…. 

 

कायकुठे?… दुपारी १२ वाजता बाहेर काय असतं माहित आहे ना ?…. , आता अजून किती वेळा ?…. ,  मरशील उष्माघाताने ….  जायचचं आहे का ?… असे संवाद आपआपल्या घरी ऐकतच नळीच्या वाटेसाठी किशोरमनोजअमितसंदीपरमणअभिलाषअभिजित आणि मी असे ८ जण शहाड स्टेशन ला भेटलो (आश्चर्य कारक रित्या यात ONGC चं कुणीच नव्हतं). मुंबईत इंटरव्ह्यु साठी आलेल्या अभिजीतचा इंटरव्ह्यु cancel झाल्याने तो पण आला होता…. नाही तो आणला गेला होता. शहाडहून जीप ने रात्री १ ला बेलपाडा गावात पोहोचलोगावातल्या आश्रमशाळेचा आश्रय रात्रीच्या झोपेसाठी घेतला. शाळेच्या एखाद्या वर्गात झोपू  म्हणून आत गेलो, तर फळ्यावर “धोका आहे” असं लिहिलेलं पाहून हसतच बाहेर आलो आणि सकाळी ६ चा गजर लावून व्हरांड्यातच झोपलो. घरी मेल्यासारखं निवांत झोपणारया मला बाहेर कुठेही गाढ झोप येत नाहीथोडसं खुट्ट झाल तरी जाग येते. सकाळी ६ ला रमण ने आवाज दिला आणि पहिल्या आवाजातच सगळे उठले. नक्की किती वेळात आणि किती वाजता पोहचू याची कल्पना नसल्याने, ऊन माथ्यावर येईपर्यंत शक्य तितकं अंतर कापायचं असं ठरल. आम्ही सर्व विधी आटोपून रमणच्या त्या “खास” sandwiches चा नाश्ता करून ६:४५ ला निघालो. मेल टाकल्यापासूनच किशोर रेकॉर्ड टाईम मध्ये पूर्ण करू ट्रेक अस म्हणत होताआणि बाकीच्या ६ जणांची पण त्याला संमती होती. पण मला माझी हद्द माहित असल्याने मला मी कच्चा लिंबू ठरण्याची दाट शक्यता वाटत होती. हळूच मनोजला म्हंटल “रेकॉर्ड टाईम वगैरे नको हं मनोज”. अमितकडचा एक टोप आणि अभिजीतचे formal shoes बेलपाड्यात  एका घरात ठेवून आम्ही निघालो. संदीप पहिल्यांदाच हरिश्चंद्राला येत होता ते पण नळीच्या वाटेने  किशोर ने निघता निघता त्याला या वाटेची कल्पना दिली. आम्ही निघालो तेव्हा रात्रीची वस्तीची एस. टी. गावातून निघण्यासाठी सीटं भरत होती. मनातल्या मनात मनावर दगड ठेवून हा शेवटचा मागे फिरायचा दोर छाटला आणि आमची ८ जणांची फौज नळीच्या वाटेकडे निघाली. 

 

मनोजअमितअभिलाषरमण आणि अभिजित फेब्रुवारीतच नळीची वाट उतरले होते त्यांना रस्ता माहित होता म्हणून कुठेही न अडता आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो होतो. कधी नदी पात्रातून तरी कधी नदी काठाने रस्ता होता. एप्रिल चे दिवस असल्याने नदीचं पात्र  कोरडं ठणठणीत होतंनदीतल्या दगड गोट्यांतून कोकण कड्याला उजवीकडे ठेवत अडखळतच निघालो. तो अवाढव्य आंतरवक्र कातळ कडा माणसाला त्याची कुवत दाखवत उभा आहे …आताशा कोकण कड्या सारख्या भीषण आणि राक्षसी वाटणाऱ्या गोष्टी मला awesome, amazing च काय पण beautiful / handsome वाटायला लागल्यात. सपाटी होती तोपर्यंत ठीक होत पण जशी चढण सुरु झाली तसा दगडांचा आकार वाढायला लागला. अंतर लवकर संपाव म्हणून पाय लांब टाकत होते पण त्यामुळे दमून जायला होत होतंत्यात नाकाने घेतलेला श्वास पुरत नव्हता म्हणून तोंडाने पण श्वास घेत होते आणि पर्यायाने अजून जास्त दमत होते. किशोर आणि अभिलाष संपूर्ण रस्ता मला “तोंड बंद ठेव” सांगत होते पण मला काही ते जमत नव्हतंतशीही ट्रेकची पहिली ३०-४० मिनीटं तुमचा अंत पहातात. पण गौरांगगौरांगच लग्नगौरांगची बायको हा सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय निघाला आणि उर्जेची एक अदृश्य लाट सळसळत गेली सगळ्यांच्या अंगातून. एका ठिकाणी सपाटी पाहून आम्ही आमचा पहिला थांबा घेतलाघसा कोरडा पडला होता म्हणून घोट घोट पाणी घेतलं. रस्त्यात कुठे पाण्याचा स्त्रोत नाही हे माहित असल्याने पाणी रेशनिंग वर होत मी मात्र मायनॉरीटीचा पुरेपूर फायदा घेत होते. या भागात बरीच माकडं आहेत हे रस्त्यातले खराब झालेले दगड सांगत होतेथोडक्यात काय तर एप्रिल च्या उन्हात या वाटेवर माकडांची पण फाटते.  ९ वाजेपर्यंत आम्ही नळीच्या तोंडाशी पोहोचलो. मी पहिल्यांदाच नळीच्या वाटेने येत असल्याने अजून किती अंतर आहे याचा काही म्हणजे काहीच अंदाज येत नव्हता फक्त टार्गेट माहित होतं. किशोर आणि  मनोज च्या म्हणण्यानुसार आम्ही बर करत होतो. हि नळीची वाट आम्हाला सह्याद्रीच रौद्र रूप दाखवत होती .मोठ मोठे दगड रस्ता अडवून उभे होते. इथे आमच्या मदतीला धावले ते बापूचैताली आणि सचिन तेंडूलकर आम्ही या तिघां मध्ये इतके गुंतलो कि त्यांच्या नादात आम्ही बराच पल्ला पार केला.

 

सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे दगड निखळत होतेआपण पायाची पकड दगडावर घट्ट करावी तर पाय न निसटता अख्खा दगडचं निसटत होता. एके ठिकाणी सगळ्यात शेवटी असलेला अभिजीतअभिलाष वर चढण्याची वाट पहात होता. इतक्यात रमण च्या पायाने एक छोटा दगड घरंगळला म्हणून अभिजित थोडा सरकला आणि तेवढयात किशोरच्या पायाखालून एक मोठा दगड अभिलाष आणि अभिजित च्या दिशेने आला. अभिलाष अशा जागेवर होता कि तो पुढे मागे कुठेही हलू शकत नव्हताआपल्या तब्येतीचा विचार न करता अभिलाष ने दगड एका हाताने थांबवला आणि बाजूला ढकलून दिला. पुढे पुढे दगड पाय ठेवू देईनात इतके निखळू लागले. मध्ये २ ठिकाणी दोर लावावा लागतोआम्ही दोर बरोबर घेतले होते पण त्यात वेळ जातो म्हणून लावायचे टाळत होतो. पैकी पहिल्या ठिकाणी आल्यावर मनोजअभिलाष आणि अमित वर गेलेआम्ही आमच्या ब्याग वर दिल्या आणि मग मी मनोज आणि अमितच्या instructions follow करत वर आले. जो  पॅच वेळ घेईल अस वाटत होत तो आम्ही ८ जणांनी १५ मिनिटात पार केला. पुढचा पॅच अजून थोडा रिस्की होताछोटासाच traverse पण भुसभुशीत दगडांचाएकदम “नजर हटी,दुर्घटना घटी” टाईप. फारच मोजून मापून पाऊल ठेवावं लागत होतं. थोडीशी चुकही तुम्हाला किमान १०० फूट खाली घेऊन जाऊ शकते. भीती वाटतेयजमत नाहीये याच्या पलीकडचा हा पॅच. खरतरं आपल्याला या रस्त्याने जायचयं असं जेव्हा अमित म्हणाला तेव्हा मी कुठे रस्ता दिसतोय का ते पाहत होते. अरे बापरे… हा रस्ता आहे ??? नक्की???.  चढताना जाणवलं नाही पण आता फोटो पहाताना लक्षात येतंय कि नळीची वाट “नळीची वाट” का आहे ते. हा ट्रेक मनोज लीड करत होता तो पुढे जाऊन सगळ्यांना कस यायचं ते सांगत होता. रमण आणि संदीप माझ्या पुढे होते आणि अमित माझ्या मागेच उभा होता. अमितनेच माझी Unnecessary Hikers शी ओळख करून दिली असल्या कारणाने बिचारा मी बरोबर असले कि माझं काळजीवाहू सरकार असतो. मी सुरुवात केली आणि पहिलचं पाऊल एक मजबूत दगड पाहून त्याच्यावर ठेवलं आणि जसा त्याच्यावर भार दिला तसा दगड निखळला आणि मी खाली. मी अगदी अलीकडे असल्याने फार धोकादायक ठिकाणी उभी नसले तरी माझं तोंड दरीकडे होतं त्यामुळे डोळ्यासमोरचं दृश्य पाहून एक क्षण सुन्न झाले. एखादं फुट उभीच्या उभी खाली घसरले आणि खाचेत अडकलेडावा पाय खरचटला चांगलाच (कसं काय ते आईला सांगितलं नाहीये मीआणि माकड हाड हलल्यासारख वाटलं. आता मात्र सगळे सावध झाले आणि मनोजने  पुढे येउन मला अगदी पाऊलंन पाऊल कुठे ठेवायचं ते सांगत तो traverse पार केला. 

 

थोडा वेळ बसून आम्ही शेजारच्या नळीत शिरलो इथून पुढे घसरणीचे पॅचेस सोडले तर फार काही अवघड चढण नव्हती. एक छोटा रॉक पॅच करून पोहोचलोच  कि आम्ही हरिश्चंद्रच्या पठारावर. हेच ते ठिकाण जिथे मनोजने अमितच्या मुलांचं बारस केलं  मुलगा झाला तर stok  आणि मुलगी झाली तर kangri  आणि जुळं झाल तर stok- kangri (संदर्भ: Unnecessary Hikers चं 2nd Himalayan expedition to Mt. Stok Kangri). अमितला आता सगळेजण छोट्या छोट्या गोष्टींवरून “अमित promotion होतयं आता तूझं, आता तरी निट वाग” सांगून वीट आणत होते. सकाळी ६:४५ ला निघालेलो आम्ही रात्र नळीच्या वाटेत काढावी लागू नये म्हणून प्रयत्न करता करता  दुपारी ११:२० पर्यंत पोहोचलो सुद्धा. माणसाला शिजे पर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत निघत नाही तसाच कोकण कडा २ मिनिटावर असताना आम्ही एका झाडाच्या सावलीत बसलो.  ” आई शपथ ११:२० अमेझिंग……. यार”. ४ तास ३५ मिनीटं४ थांबे२ छोटे अपघातआणि दोरचा अजिबात वापर नाही आम्ही आता याची कारण शोधत होतोरमण ने sandwich मध्ये नक्की काय घातलं होतंयावर त्याच ते “और थोडासा प्यार” हे उत्तरहा अफू/गांजा ला तर प्यार म्हणत नव्हता ना. माझं लेडी लक/पायगुण (हे फार महत्वाचं कारण असू शकतं)आज अमावस्या तर नाहीये ना?, आपण रात्री शाळेतच वारलो आणि आता आपली भूतं तर नाही ना आली वर?? असे विनोद करत होतो. अमितचं “पेपर कठीण आहे म्हणून इतका अभ्यास केला कि मेरीट मध्ये आलो” हे मात्र सगळ्यांना पटलं. आश्चर्य म्हणजे कुणीही भयंकर थकलं नव्हतं सगळे छान फ्रेश दिसत होतेना कुणाला कडकडून भूक लागली होतीना कुणाला उन्हाचा तडाखा जाणवत होता. मी स्वत:ला फारच अंडर एस्टीमेट करत होते, “not bad कांचनछान केल कि तू”. आजचा दिवस आमचा होता. ” आज आमच्याकडे खूप वेळ होता” म्हणून मग आम्ही खूप वेळ कोकण कड्यावरच बसून राहिलो. रेलिंग वगैरे लावून कोकण कडा विद्रूप करून ठेवलाय… बरं त्या रेलिंगचा ठोस काही उपयोग तर तसही काही नाही. कोकणकडयावर फक्त आम्ही ८ जण आणि एक कुटुंब कळसुबाई हून आलं होतं पाचनईत पाहुण्यांकडे ते होते. टळटळीत दुपारी आम्ही कोकण कड्यावर गप्पा मारत बसलो होतो. अमितकिशोर त्याच्या laptop चा काहीही प्रोब्लेम झाला कि कसा फोन करतो ते काहीतरी सांगत होता. तर त्यावर लव गुरु किशोरने लगेच “टेक्नीकल काही असेल तर रमन ला विचारा पण ह्रुदया बद्दल काही प्रश्न असतील तर ते मला विचारा” असा सल्ला दिला. आणि खरंही आहे ते ग्रुप मध्ये टेक्नीकल ते हृदय सगळ्याचे expertise आहेत.  त्यात रमणचं आणि सी. व्ही. रमणचं तर नक्की कुठेतरी काहीतरी connection असणार. रमण म्हणजे गुगल आहे… तुम्हाला कुठे लागून रक्त येतंय एवढ जर त्याला सांगितलं तर तो तुम्हाला वाहणाऱ्या रक्ताची गुठळी कशी होते(Blood Clot  कसं होत) ते DNA  म्हणजे नक्की कायया पैकी कशाचीही माहिती देऊ शकतो. किशोर बाबांचं थोडंसं वेगळं आहे म्हणजे त्यांचा विषय वेगळा आहे आणि कार्य खूप विस्तारलेलं आहे. खूप लोकांच जीवन मार्गी लावलय बाबांनी. शिष्य गण तर अफाट आहेआणि बाबांचा long term वर अजिबात विश्वास नाहीये.    

 

पाचनईतल्या लोकांची दुकानं कम हॉटेलं कम टपरया आहेत वरतीन टपऱ्या तर अगदी कोकण कड्यावरच होत्या. एका काकांना लिंबू सरबत मिळेल का विचारलं आणि २-२ ग्लास सरबत पिऊन जीव गार केला. पिठलं भाकरी पण मिळते या काकांच्या वाक्याने आमच्या रात्रीच्या जेवणात बदल झाला. हरिश्चंद्रेश्वराच्या देवळात जेऊन थोडी विश्रांती घेऊन तारामती पाहायला जायचं ठरलं. देऊळ कोकण कड्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जसं देऊळ दृष्टीपथात आलं तसं जाणवलं कि शनिवार असूनही अजून कुणीच ट्रेकर्स नव्हते इथे. मनोजला आव्हाडांनी इथेहि बंद पुकारला कि काय अशी शंका आली. देवळात जाऊन हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन घेतलं. देऊळ भीमाशंकर मंदिरासारखं  हेमाडपंथी बांधकामाचं आहे. आत जाताना मंदिराच्या डाव्या भिंतीला पूर्वाभिमुख गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या आतल्या नंदी मागे एक गुफा होती आणि गुहेच्या दोन्ही बाजूला पाण्याची टाकंआम्ही दुपारच जेवण करून थोडा वेळ आराम करावा म्हणून पाठ टेकली. आता एवढ्या लवकर पोहोचलो होतो कि वेळ जाईना. किशोरला यामुळे vaccum आल्यासारखं वाटू लागल होतं. रेकॉर्ड टाईम मध्ये हरिश्चंद्र गड करणाऱ्या unnecessary hikers चं मन आता भौतिक जगात आलंआता सगळ्यांना आपण रविवारी काय काय करू शकतो ते आठवू लागलंअभिलाषला त्याच्या Violin class ची ओढ लागली. किशोर आणि अभिलाष आजचं उतरू गड अस म्हणू लागले. लवकर घरी गेलो तर आनंदच होता पण सगळेजण या नळीच्या वाटेसाठी अगदी वेळ काढून आल्यामुळे सगळेजण सगळ्या पर्यायांसाठी तयार होते. मनोजला मात्र रात्री कोकण कड्यावर झोपायचं होतं, त्यामुळे तो काही तयार होत नव्हता. दुपारी सगळेजण डुलक्या काढत असताना किशोर मात्र hyper active मुलांसारखा मंदिरात आणि आजूबाजूला फोटो काढत फिरत होता. झोप झाल्यावर आम्ही चहा करायला घेतला मी यापूर्वी  केव्हाच दुधाच्या पावडरचा चहा केला नव्हता त्यामुळे अंदाज येईना४०० ग्रॅम दुध पावडर फक्त ८ जणांच्या चहाला वापरली मी, हा पण एक रेकॉर्डचं म्हणावा लागेल. चहापाणी झाल्यावर आम्ही तारामती पाहायला निघालो. किशोरला तारामतीत इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे तो मंदिरातच थांबला. तारामती हे कळसुबाई आणि साल्हेर नंतरचं महाराष्ट्रातलं सर्वात उंच ठिकाण आहे.  पिंपळगाव जोगा धरणमुंबई- नगर NH 222, माळशेज घाटनानाचा अंगठाभैरवगडघनचक्करआजा पर्वतलव-कुशकलाडगडनाप्टा असा बराच मोठा परिसर दिसतो इथून. 

 

आम्हाला सूर्यास्त पाहायलाजेवायला आणि झोपायला कोकणकड्यावर जायचं होतं म्हणून फक्त १५-२० मिनिटात आम्ही परत फिरलो. आमच्यापैकी खूप जणांनी आर्मी प्रिंट च्या कार्गो ट्राऊसर्स घातलेल्या होत्याते पाहून मंदिरा जवळच्या एका टपरी वजा हॉटेल मधून “हे मिल्ट्री वालेत…. आपण कापड़डं  पाहून सांगू शकतो काय्य्य ??? ऐकू आलं, खरतरं त्या अख्ख्या हरिश्चंद्र गडावर गावकरी सोडून आम्ही ८ जणच असल्याने ते फारच निरखून पाहत असावेत आम्हाला.

 

मंदिरातून आम्ही आपलं बिऱ्हाड उचलुन परत कोकण कड्या कडे निघालो. सुर्यनारायण जणू आमच्यासाठीचं ताटकळले होते. सकाळच्या लिंबू सरबत वाल्या काकांना जेवणासाठी बेसन करायला सांगितलं आणि आम्ही सूर्यास्ताची वाट पाहू लागलो. हळूहळू आभाळाला केशरी रुपेरी किनार येऊ लागली. नोकरीव्यवसाय, appraisals, promotions, बायकामुलंलग्न आणि असे  इतर अनेक विषय त्या अर्ध्या तासापुरते तरी त्या रंगामध्ये विरघळून गेल्यासारखे वाटले. आयुष्यातला एक अप्रतिम सूर्यास्त पहिल्याचा आनंद मनात साठवत आम्ही जेवायला आलो . वातावरणात आता कमालीचा आणि अनपेक्षित बदल झाला होता. कोकण कड्यावर सनानून थंडी जाणवायला लागली. काकांच्या त्या खोपटात मी थेट चुली जवळीची जागा पकडली. मावशींनी पिठलंबाजरीची भाकरी आणि भात केला होता. बेसन आणि चपातीने सुरुवात केलेले आम्ही भाकरीभात सगळ्याला आळं घालून आलो. मावशींच्या हाताला चव होतीसगळा मेन्यु पहिल्या नंबराने पास झाला. बेसन तर अगदी कढई खरवडून खाल्लं. मावशींना स्वत: साठी व काकांसाठी परत कराव लागलं. चुलीपासून दूर झाल्यावर पुन्हा थंडी वाजू लागली म्हणून मग चुलीतलीचं काही लाकडं आणून बाहेर शेकोटी केली. किशोरअमितमनोज आणि रमण कोकण कड्यावर थंडी अनुभवत होते. त्यांनी आम्हाला काहीतरी पाहायला म्हणून हाक मारली. कोकण कड्याकडे जायच्या त्या १५-२० पावलात मी अगदी गार पडले. भर उन्हाळ्यात, एप्रिलच्या महिन्यात हरिश्चंद्र गडावर १ फुट पुढचं न दिसण्याइतकं धुकं पसरलं होतं. विचित्रचं… नाही??? त्या अंधारात ते ढग आहेत कि धुकं हेही कळत नव्हत. जे काही होत ते इतक दाट होतं कि मागून विजेरी मारल्यावर त्याची आकृती दिसत होती धुक्यावर. काल पाचनईत गारांचा अवकाळी पाऊस पडला होता त्याचाच परिणाम असावा हा. 

 

एवढ्या थंडीत कोकण कड्यावर झोपणं  म्हणजे माझ्यासाठी तरी आत्महत्याचं ठरली असती पण मी काही बोलायच्या आधीचं किशोरने आपण देवळात झोपायला जावू म्हणून जाहीर केलं. मनोज काहीच बोलला नाही, त्याची सहमती नसली कि तो असाच काहीच बोलत नाही. तो निरुत्साहानेच निघालात्याची फार म्हणजे फारच इच्छा होती कोकण कड्यावर झोपायची. पण या वातावरणात एकूण सगळ्यांसाठी (म्हणजे माझ्यासारख्यांसाठी) ते अशक्य होतं. आम्ही आता परत आमची दप्तरं पाठीवर टाकून मंदिराकडे निघालो. मावशी आणि काका पण आमच्याबरोबर निघालेदोघेही फार प्रेमळ होते. “पोरीची काळजी घ्या” असं वारंवार सांगत होते. गावाकडच्या लोकांना एकंदरच खूप माया असते. देवळात पोहोचलो तेव्हा अजून एक ग्रुप जेवण तयार करत होता. आत जाऊन आम्ही आपापल्या जागा ठरवल्या आणि अंथरूणं टाकली.  गुफेच्या तोंडाशी वारयाबरोबर धुकं वाहताना दिसत होतं जणू देऊळ ढगात बुडालं होतं. अभिजित काहीच तयारी ने आला नव्हतात्याच्याकडे काहीच नव्हतं पांघरायला, कसा झोपला तो त्या दिवशी त्यालाच माहित???

 

सकाळी ६ ला रमणच्या आवाजाने जागे झालो खरं, पण तसेच स्लीपिंग ब्याग मध्ये बसून राहिलो, १० मिनिटांनी रमन ने परत आवाज दिल्यावर मात्र पटापट उठलो. कालच्या सकाळी १ मिनिटही वाया न घालवलेले आम्ही आज मात्र शिथिल झालो होतो. कालच्या ४ तास ३५ मिनिटांनी आमचा आत्मविश्वास फारच वाढवला होता. आता साधले घाट पण लवकरात लवकर उतरू असा घाट  घातला. ब्यागा आवरून आम्ही एका टपरीत चहा आणि ब्रेड-बटर चा नाश्ता केलाटपरीचा मालकचं आम्हाला साधले घाटाचा रस्ता दाखवणार होता.सुरवातीचा रस्ता अवघड नसला तरी बारीक बारीक दगडांमुळे  घसरणीचा होता. माझं मानसिक असावं बहुदा पण मला अशी घसरण पहिली कि भीती वाटते. मोडकळीला आलेल्या कल्याण दरवाजात थोडी विश्रांती घेवून आम्ही उतरणीला लागलो आणि त्या उतरणी नंतर पुढे अर्ध्या-एक तासाचं पठार आहे. पठार संपलं कि आलाच साधले घाट.सकाळी ७:३० ला निघालेलो आम्ही ९:३०  वाजता साधले घाटाच्या ओठात होतो. इथे थोडा वेळ विश्रांती साठी थांबलो.  कालचा दिवस अपेक्षेपेक्षा कमी हेक्टिक होता म्हणजे आम्हाला खूप वाईट परिस्थिती अपेक्षित होती म्हणून काल सगळचं रेशनिंग वर होतं त्यामुळे आमची खूप संत्री उरली होती पण मी मात्र माझ्या ब्याग मधलं पाणी आणि संत्री साधले घाटाच्या आधी कशी संपतील याची रीतसर काळजी घेत होते. 

 

साधले घाट नळीच्या वाटेची सोपी आवृत्ती होती. उतरताना थोडं जपून उतरावं लागत होतं. इथे माझा वेग बऱ्यापैकी मंदावला. कदाचित मला वजा केलं असतं तर बाकीच्यांनी साधले घाट पण रेकॉर्ड टाईम मध्ये पूर्ण केला असता. आता ऊन पण लागायला सुरवात झाली. आम्ही एप्रिल मध्ये ट्रेक करतोय याची जाणिव आता कुठे व्हायला लागली होती. सुरवातीचा उतार फारच उभा होता. साधले घाट दमवणार हे अगदी सुरवातीलाच लक्षात आलं माझ्या. पण या मनोजकिशोरअभिलाषअमित यांच्या शरीरात हाडंसांधेस्नायू असं काही आहे कि नाही अशी शंका येते मला केव्हा केव्हा. यांची खरचं भूतं नव्हती ना झाली कालं???गमतीचा भाग जाऊ दे, पण यांचं कौतुक आहे मलाकिरकोळ शरीरयष्टी (अभिलाष ची तर फक्त यष्टीचं) असून सुध्धा दोरजेवणाचे टोप, stove, रॉकेलतांदूळ, tomato, कांदा असं काय काय, वर स्वत:चं सामान carry करतं आणि याउप्पर त्यांचे ते नाजूक आणि प्राणप्रिय कॅमेरे सांभाळत सर्वांच्या पुढे असतात. रस्त्यात कधी उजव्या बाजूला वळतं तर कधी डाव्या बाजूला वळतं एका मागून एक ओढे पार करत होतो किंवा कदाचित एकच ओढा इकडून तिकडून येत आमच्या पायात घुटमळत असावा. रस्त्यातले ते मोठ मोठे दगड धोंडे पार करत आम्ही एका छोट्या पाण्याच्या खडग्याजवळ टेकलो. हा रस्त्यातला एकमेव पाण्याचा स्त्रोत होता. इथे पोटभर पाणी प्यालो आणि जरा मोठी विश्रांती घेतली. कधी घसरडी पायवाट तर कधी ओढा असं करत करत शेवटी एकदाचा संपला तो साधले घाट. मघाशी घाटाच्या तोंडाशी काळेवाडी हून “मोहाची” वर घेवून जाणारे एक काका भेटले होतेत्यांनी आंब्याच्या झाडापासून डावीकडे वळा म्हणून सांगितलं होतं मग अंदाजानेच एका आंब्याच्या झाडापासून डावीकडे वळलो. खरतरं काल कोकण कड्यावरून बेलपाडा आणि काळेवाडी दोन्ही गावं पाहिलेली असल्याने दिशांचा थोडा अंदाज आला होता. खाली रस्त्यात करवंदाची जाळी दिसली तसे आम्ही अगदी सोमालियातून आल्यासारखे तुटून पडलो करवंदांवर. करवंद तोडताना चिक लागून हात चिकट होताहेत हे सुद्धा नजरेआड केलं. आताशा माणसांच्या खुणा दिसू लागल्या होत्या. दिशा माहित असल्याने चालत राहिलो पण आता ऊन असह्य होऊ लागलं होतं,  घामाच्या धारा शर्टाच्या बाहीला पुसत पुसत चालणं मात्र कायम ठेवलं. ऊनघाम आणि चिकट झालेले हात आता वीट आणत होते. चालता चालताच अभिलाष कडे  हात धुण्यासाठी पाणी मागितलं तर मागून येणारा संदीप “thank you kanchan” म्हणत बसलाच खाली. माझ्या आईचा उष्माघात तो हाच असावा बहुदा. संदीप अतिशय मितभाषी आहेपण T- shirt मात्र खूप बोलक होत त्याचं “Together we can achieve more”  नळीच्या वाटेसाठी खास तयार करून घेतल्यासारखं. काळेवाडितली घरं मागे पडून आता बेलपाडा गावातली पाण्याची टाकी दिसली तस्स सगळ्यांनी हुश्श केलं. आम्हाला हरीश्चान्द्राहून बेलपाडा गावात यायला  ५ तास लागले होते१२:३० ला आम्ही गावात शिरलो. गावात शिरताना एका घरासमोर सिमेंटची पाण्याची टाकी दिसली. उन्हाने करपलेल्या आम्ही गार पाण्याने तोंड-हात धूतलं. तापल्या जमिनीवर पाणी ओतल्यावर कशा वाफा निघतात तसं काहीतरी वाटलं अंगाला पाणी लागल्यावर. काल अमितने ज्यांच्या घरी टोप ठेवला होता त्यांच्या अंगणात टेकलो. अमितने फोन करून गाडी बोलावून घेतली होती. आम्ही फार टाईम पास न करता ब्यागा गाडीत ठेवून निघायची तयारी केली. जुने खजिनदार अमित कामावर रुजू झाले होते, त्यांनी balance sheet पाहून आम्हाला  non-veg खाऊ घालायचं आश्वासन दिलंमोरोशीजवळ RAINBOW नावाच्या हॉटेल ला गाडी लावली आणि चिकन सुक्कारोटी वर ताव मारला. चिकन छान असलं तरी शाकाहारी अभिलाष आणि संदीप ने मागवलेली शेवभाजी भारी होती (सोमवारी सकाळी लगेच गुगळली शेवभाजीची रेसिपी). ४:०० ला आम्ही शहाड स्टेशनला पोहोचलोहि. आता अभिलाषला त्याचा violin क्लास attend करता येणार होतारमणला नंदू ला लवकर भेटता येणार होतं,  मलापण पुण्याहून अवचित भेटीसाठी आलेल्या मामे भावंडांना भेटता येणार होतं. सगळ्याच दृष्टीने हा ट्रेक आमच्यासाठी surprise package ठरला होता . 

 

रविवारी रात्री छान आराम केलेले स्नायू नेहमीप्रमाणे सोमवारी शरीरात असल्याची जाणीव करून देत होते. रमणच्या भाषेत सांगायचं झाल तर आता आमच्या adrenal glands नि dopamine आणि endorphin release करायचं थांबवलं होतं (तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी: natural pain killers नि काम करायचं बंद केलं होतं) तर इकडे facebook वर आमच्या या पराक्रमाच्या अभिलाषच्या status update वर “Next plan…..one day trek to Harishchandra gad via Nalichi vat” अशी किशोर ची कमेंट आली. किशोर तू सदाहरित देव आनंद असलास तरी जगात ए. के. हंगल पण असतात अरे

 

संघ      किशोरमनोजअमितसंदीपरमणअभिलाषअभिजित आणि कांचन 

तारीख : १९ -२०- २१ एप्रिल २०१३.  

वेळ :     बेलपाडा ते कोकणकडा नळीच्या वाटेने (दिनांक २० एप्रिल सकाळी ६:४५ ते ११:२० एकूण

       ४ तास ३५ मिनिट) 

                हरिश्चंद्रेश्वर ते बेलपाडा साधले घाटाने (दिनांक २१ एप्रिल सकाळी ७:३० ते १२:३०  

       एकूण ५ तास)  

 

  Kishor’s photo gallery

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>